मनसेने कात टाकली?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फेरीवालाविरोधी आंदोलन चांगलेच गाजले. मुंबई, पुण्यासारख्या बड्या शहरांमध्ये फेरीवाला ही समस्या होऊन राहिली आहे. कोणीही, कसाही, कुठेही धंदा करतो. त्याच्यासाठी कर भरणार्यांनी मात्र अंग चोरून चालायचे, अशी या शहरांची अवस्था होती. त्याबद्दल कितीही तक्रारी केल्या, विनंती, अर्ज केले तरी फेरीवाल्यांवर कारवाई होत नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने फेरीवाल्यांबाबत काही नियम घालून दिले होते. फेरीवाल्यांना रेल्वे स्थानकापासून दिडशे मीटरच्या परिसरात बसू द्यायचे नाही, असे स्पष्ट आदेश न्यायालयाचे होते. पण त्या आदेशाकडे कानाडोळा करत फेरीवाले मुंबईकर, पुणेकरांच्या जीवावर रस्त्यात, फूटपाथवर धंद करत होते. कायदे, नियम सर्व तयार असताना भ्रष्टाचारी सरकारी यंत्रणा मात्र फेरीवाल्यांवर कारवाई करायल तयार नव्हती. अशा परिस्थितीत मुंबईत एल्फिस्टन रोड रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीची घटना घडली. एक वेळी २३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. मुंबईतील या भयानक घटनेने मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकला. आपण असेच किड्यामुंगीसारखे मरत रहाणार. नियम, कायदे दाखवत परप्रांतियांच्या लोंढ्याला रोखण्यासाठी कुणीही पुढे येणार नाही, हे मुंबईकराला कळून चुकले. मुंबईचा भूमीपुत्र, सर्वसामान्य मराठी माणूस त्यात होरपळत होता. अशावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी माणूसाला आशेचा किरण दाखवत, फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश मनसे सैनिकांना दिले.
मनसे सैनिक तरी कोण? तोही सर्वसामान्य मुंबईकरच. फेरीवाले, परप्रांतियांच्या अनागोंदीत भूमीपुत्राला जगण्याचा हक्कही नाकारला जातोय, याची त्याला जाणीव होती. राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वामुळे तो आपला राग व्यक्त करू शकत होता. मनसेने दिलेली १५ दिवसांची डेडलाईन संपताच, त्याने हिसका दाखवला आणि मुंबईचे अनेक रस्ते फेरीवाला मुक्त झाले. आंदोलने घ्यायची पण ती तडीस न्यायची नाहीत, यावरून मनसेवर रागवलेला मराठी माणूस फेरीवाल्यांच्या आंदोलनामुळे पुन्हा मनसेच्या जवळ आला. वास्तविक मनसे ही संघटनाच शिवसेनेतून निर्माण झालेली आहे. शिवसेनेत अन्याय होत असल्यामुळे राज ठाकरे यांनी सेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. त्यावेळी राज ठाकरे यांनी आपली संघटना ही केवळ मराठी माणसांसाठी, भूमीपुत्रांसाठी काम करेल हे स्पष्ट केले होते. तेव्हा मराठी माणसांसाठी काम करणारा शिवसेना हा पक्ष राज्य अस्तित्त्वात होता. त्याच पक्षाच्या अजेंड्यावर आपला नवीन पक्ष स्थापन करण्यात मोठा धोका होता. एका पक्षाच्या अजेंड्यावर नव्याने काम करत नवीन पक्ष घडवणे तितकेसे सोपे नव्हते. पण राज ठाकरेंनी हा धोका पत्करला होता. हिंदुत्त्वाचा अजेंडा स्वीकारलेल्या सेनेचा मराठी माणसांकडे, त्यांच्या हिताकडे दुर्लक्ष झालेले होते. मूळ सेनेचा या अजेंड्यावर, त्याच पक्षाकडून काम होत नव्हते. त्यामुळे राज ठाकरेंच्या पक्षाकडे राज्यातील मराठी माणूस, जो पूर्वी सेनेचा पाठिराखा होता, तो ओढला गेला. परप्रांतिय, दुकानावरील मराठी पाट्यांचा मुद्यावर मनसैनिकांनी रान पेटवले. त्याचा परिणाम म्हणून मनसेला विधान सभा, मुंबई, पुणे, नाशिक महानगरपालिकेत घवघवीत यश मिळाले. हे यश खरंच मनसेचे होते का? मराठी माणसांचा अजेंडा हा सेनेचा होता. सेनाप्रमुख बाळासाहेबांनी त्यावर एक राज्यव्यापी संघटना आणि नंतर राजकीय पक्ष निर्माण केला होती. पण बाळासाहेबांच्या वाधर्क्यामुळे आणि नव्या सेना पक्षप्रमुखांच्या धोरणांमुळे सेनेला आपला हा अजेंडा टिकवता आला नाही. अन्यथा त्याच अजेंड्यावर मनसेला यश मिळालेच नसते. पुन्हा मनसैनिकांनी असे काय वेगळे केले होते?
शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेल्या सेनेच्या पहिल्या सभेत मुंबईच्या अवस्थेवर भाष्य केले होते. परप्रांतियांच्या लोंढ्यांना रोखायला हवे, असे त्यावेळी बाळासाहेब म्हणाले होते. मनसे स्थापन झाल्यापासून राज ठाकरे तेच वारंवार पण सातत्याने सांगत आहेत. मुंबईच्या वाढलेल्या जीवघेण्या गर्दीचा परिणाम हा ट्रेन, बसमधून प्रवास करणार्या सर्वसामान्य मुंबईकराला जाणवतो. परप्रांतियांच्या लोंढ्यामुळे होणारी गैरसोय ही सर्वसामान्य मुंबईकराला सतावत होती. पण सेनेने हा मुद्दाच सोडून दिला. नेमका तोच मुद्दा राज ठाकरेंनी लावून धरला. त्याच्यासाठी आंदोलने केली. मनसैनिक रस्त्यावर आले. त्यामुळे शिवसेनेचा मतदार दुरावला आणि तो मनसेकडे आला. मात्र राज ठाकरेंना हा मतदार फार काळ टिकवता आला नाही. एका बाजूला मोदींची लाट आणि दुसर्या बाजूला अनेक मुद्यांवर मनसेकडून धरसोड झाली. त्यामुळे दुखावलेला मतदार पुन्हा शिवसेनेकडे गेला. त्याचा परिणाम म्हणून २०१४ साली झालेल्या विधान सभा निवडणुकीत मनसेला केवळ एकच जागा मिळाली. पक्ष नेतृत्त्वाकडून काही चुका झाल्या. त्या लक्षात आणून दिल्यावर त्वरीत त्या सुधारल्या नाहीत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तर राज ठाकरे हे कौटुंबिक समस्यामुळे निवडणुकीपासून लांबच राहिले. पण म्हणून मनसे हा पक्ष संपलेला नव्हता. सात-आठ वर्षांपूर्वी मुंबई, पुण्यातील मराठी माणूस, भूमीपुत्राला आपल्याच राज्यात ज्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या त्या कायम होत्या. किंबहुना त्यात वाढ झालेली होती. राज्यव्यापी सेनेला देशव्यापी होण्याची स्वप्ने पडू लागली होती. त्यामुळे त्यांच्याकडून मराठी माणसांच्या हिताची जपवणूक होणे शक्य नव्हती. गेल्या चार-पाच वर्षांच्या कालावधीत मनसेमध्येही अनेक स्थितंतरे आली. मनसेचे अनेक नेते, कार्यकर्ते राज ठाकरे यांना सोडून अन्य पक्षात गेले होते. राज ठाकरे यांनाही कौटुंबिक अडचणींमुळे पक्षाकडे शंभर टक्के लक्ष देणे होत नव्हते. त्याचा परिणाम असा झाला की, हा पक्षच नष्ट होतोय काय अशी भीतीही व्यक्त करण्यात येत होती.
कुठलाही पक्ष, संघटना ही मृत होत नाही. तिला शैथिल्य येते, मात्र ते तत्कालिन असते. नेतृत्त्व सक्षम असेल तर राखेतून पुन्हा तो पक्ष फिनिक्स भरारी घ्यायला सज्ज होतो. पुन्हा नेता कितीही मोठा असला तरी त्याची सर्व भिस्त ही कार्यकर्त्यांवर अवलंबून असते. पक्षाला मरगळ आलेली असली तरी राज ठाकरेंकडे असलेला मनसैनिक खंबीर होता. साहेबांच्या एका आदेशाने जीवावर उदार होणारा होता. त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज होती. महानगरपालिका निवडणुकीच्या पराभवानंतर राज ठाकरे यांनी प्रथम पक्षांतर्गत साफसफाई सुरू केली. तरुण कार्यकर्त्यांना पुढे आणले. तरुण नेत्यांची फळी उभारली. त्यांच्यामार्फत पक्षाला आलेली मरगळ झटकण्याचा प्रयत्न केला. फेरीवाल्यांचा मुद्दा हाती घेतल्यावर त्यात मराठी फेरीवालेही आहेत याचा विचार केला नाही. त्यांच्या मिळणार्या कथित मतांवर पाणी सोडले आणि सर्वंकष मराठी माणसांसाठी फेरीवालाविरोधी आंदोलन हाती घेतले. त्याचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत.
दादरसारख्या ठिकाणी ऐनगर्दीच्या वेळी लोकांना चालायला ऐसपैस जागा उपलब्ध झाली. मुंबईचे सर्व रेल्वे स्थानक फेरीवाला मुक्त झाले. वास्तविक हे काम राज्य सरकारचे पोलीस, महानगरपालिका करू शकली असती; पण अर्थकारणामुळे त्याकडे जाणूनबुझून दुर्लक्ष करण्यात आले होते. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी एक-दोन ठिकाणी खळ्खट्याक केले आणि बाकीचे काम झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाने केले. राज्यात भाजपचे सरकार, त्यांचे पोलीस, महानगरपालिकेत सेनेची सत्ता, तरीही फेरीवाला हटवण्याचे श्रेय या दोन पक्षाला मिळाले नाही. केवळ आदेश आणि आंदोलनामुळे मनसेला त्यात भाव खाऊन गेली. बाळासाहेब ठाकरे या माणसाची ताकदही अशीच होती. बाळासाहेबांचे आदेश आले की, सरकार, प्रशासन जागे व्हायचे. त्वरीत कामाला लागयचे. आज राज ठाकरेंनी तेच करून दाखवले नाही काय? या एका आंदोलनाने मनसेला पुन्हा उभारी देण्याचे काम केलेले आहे. मराठी माणसाला पुन्हा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. तो कायम ठेवणे आणि त्याच दिशेने वाटचाल करणे आता गरजेचे आहे. समुद्रात येणार्या प्रत्येक लाटेनंतर एक मोठा खड्डा तयार होतो. जो या खड्यातून सहीसलामत बाहेर येतो तोच पुन्हा लाटेवर स्वार होण्यासाठी सज्ज होतो. मनसेने लाट बघितली आणि त्यानंतरच्या खड्ड्यातून बाहेर पडण्याची प्रामाणिक धडपडही कायम ठेवलेली आहे. त्यामुळे हा पक्ष पुन्हा लाटेवर स्वार होण्यासाठी सज्ज झालाय.

अचूक विश्लेषण.
ReplyDelete