सर्वसामान्यच खरा अर्थतज्ज्ञ
७ नोव्हेंबर २०१७, वार : मंगळवार
वेळ : सकाळी ६ वा. चाळीतील व्यायामशाळेत माझ्यासोबत दोन तरुण व्यायाम करत होते. व्यायाम संपल्यावर त्यांना सहज विचारले, ‘नोटाबंदीमुळे तुम्हाला काय अडचण आली?’ त्या दोन तरुणांपैकी एकाने सांगितले की, आम्हाला कायच अडचण नाही. पण नोटाबंदीमुळे खूप प्रॉब्लेम झाला असे सांगतात. आम्हाला तशी काहीच अडचण आलेली नाही.
वेळ : सकाळी ७.३० वा. चाळीखाली रस्त्यावरील चहाचा स्टॉल. चहावाल्यालाच विचारले, ‘परशा नोटबंदी झाली त्यामुळे तुला काय प्रॉब्लेम आला का रे?’ तो उत्तरला, ‘अहो साहेब, नोटबंदी झाल्यापासून बीएमसी खूप त्रास द्यायला सुरुवात केली आहे. अगोदर महिन्यातून कधीतरी चोरगाडी यायची. आता रोज येते. खूप त्रास होतोय साहेब. बाकी कायच त्रास नाय बघा.’
वेळ : सकाळी ८.१० वा. दारात आलेला भय्या मासेवाल्याकडून पत्नीने मासे घेतल्यावर त्याला नोटबंदीबद्दल विचारले. तो म्हणाला, साहाब फिरसे होनेवाली है क्या नोटबंदी? वो टाईम थोडी तकलिफ हुई| पर बाद में सबकुछ ठिक रहा| अब कुछ प्रॉब्लेम नही है|
वेळ : सकाळी ९.३० वा. चाळीखाली आलेल्या टॉमेटोवाल्याला विचारताच तो म्हणाला, आपल्याला कायच प्रॉब्लेम नाय साहेब. माझ्याकडे ५०० रुपयांच्या पाच नोटा होत्या. एक तास लाईनीत उभा राहिलो आणि बदलून घेतल्या. तेव्हढीच तकलीफ. पण तुम्हाला सांगतो, मी जेथून माल घेतो ना तो मालक चांगलाच कावला होता. साल्याकडे खूप पैसा होता. लय नाद करायचा पैशाचा. सगळा केला कचर्याच्या डब्यात तेव्हापासून भाड्याचा माज उतरला. आता निदान चांगलं तरी बोलतो आमच्याशी.
वेळ : ९.३० वा. त्याच टोमॅटोवाल्याकडे एक शिवसैनिक टोमॅटो विकत घ्यायला आला होता. आमचे संभाषण ऐकून तो म्हणाला, नोटाबंदीमुळे लोकांना खूप त्रास झाला. किती तास लोक लाईनमध्ये उभे होते माहित आहे? तो काळा पैसा काय बाहेर आला नाय. महागाई पण किती वाढली नोटबंदीमुळे. हे बघा टोमॅटो ६० रुपये किलो झाले. कांदा ४० रुपये किलो. नोटबंदीमुळेच झाली ही महागाई. आता जीएसटी आणला आहे. मोदी ना या देशाची वाट लावणार आहेत.
वेळ : सकाळी १०.१५ वा. लोअर परळ रेल्वे स्थानक. बूटपॉलिश करणार्या व्यक्तीला नोटाबंदीबाबत छेडले. तो उत्तरला, ‘साब जो हुआ तो अच्छा हुआ. तभी तो हमने मोदी को युपी में चुनके दिया. हम तो पहिलेसेही गरिब. हमारे पास किधर पैसा है. पर पैसे के बलपर जो नाचते थे आज उनका तो पुरा नक्शा उतर गया.’
वेळ : सकाळी १०.१६ वा. लोअर परळहून दादरला निघालेली ट्रेन, दुसरा डब्बा. समोर एक टिपटॉप काका बसले होते. बहुतेक गुजराती होते. त्यांना हाच प्रश्न विचारला. ते म्हणाले, बेटा मै धंदा करत हूँ. नोटबंदीसे बहोत परेशानी हुई. मार्केट में जो पैसा था वो एकदमसे बंद हो गया. रोलिंग के लिए भी किसी के पास पैसा नही. नोटबंदी के पहिले एक व्यापारी के पास कमसे कम दिन में एक-दोन लाख की कॅश रहती थी. नोटबंदी के बाद सब कुछ बदल गया. रोकडा व्यवहार खत्म. बँक से व्यवहार करो. पैसा हात मे रहा ही नही.
वेळ : सकाळी ११.१० वा. दादरमधील आयडीबीआय बँक, एक बँक कर्मचारी, बँकेच्या बाहेरच भेटले. त्यांनाही नोटबंदीबद्दल विचारले, ते म्हणाले, अहो, नोटबंदीच्या काळात आम्ही जे काम केले ना. खरंच त्यापूर्वी आम्ही तसे काम कधीच केले नव्हते. तीन दिवस सलग काम. त्यावेळी त्रास झाला खरा पण कामाचे सुख काय असते ते त्या तीन दिवसांत अनुभवले. आमच्या ग्राहकांना कमीतकमी त्रास कसा होईल याचीच सातत्याने काळजी घेत होतो. अन्न नाही, पाणी नाही. सतत काम. पण नोटबंदी यशस्वी करण्यात आम्ही बँक कर्मचार्यांचा मोठा हात आहे की नाही तुम्हीच सांगा.
वेळ : दुपारी १२.३०. मध्य रेल्वेचे दादर स्थानक प्लॅटफॉर्म क्रं. ३. मोठालं गाठोडं घेऊन बहुतेक कर्जतहून दादरला उतरलेली एक आदिवासी महिला. कोणाची तरी वाट पहात उभी होती. ताई, तुम्हाला नोटबंदीचा काय त्रास झाला का? मी त्यांना विचारले. ‘त्रास काय नाय बा. पण मला त्यात घेऊ नका. मी एक साधी बाई आहे. दादरला पानं विकायला येते.’
वेळ : दुपारी १.४० आझाद मैदान. छत्रपती शिवाजी टर्मिनस. घाईघाईने आझाद मैदानाकडे निघालेला, एका दलित संघटनेचा कार्यकर्ता असलेला एक मित्र भेटला. हाय, हॅलो झाल्यावर त्याला नोटाबंदीबद्दल विचारले. तो म्हणाला, नोटबंदीमुळे देशाची पूर्ण वाट लागली आहे. देशाचा जीडीपी खाली आला आहे. देशात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. हे सरकार स्वत:ची हुकूमशाही देशावर लादत आहे. देशाचे संविधान बदलण्याचा त्यांचा कुटील डाव आहे. मी त्याला तेथेच रोखत विचारले, पण नोटाबंदीचा तुला प्रत्यक्ष काय तोटा झाला ते सांग. तो म्हणाला, मला स्वत:ला तोटा काहीच नाही झाला रे पण समाजासाठी, देशासाठी आपण लढायला नको का?
वेळ : दुपारी २.१५ वा. आझाद मैदानाचीच फूटपाथ, अंगावर थाप पडली. एक जेष्ठ कार्यकर्ते मागे होते. ‘उद्या मोर्चा कव्हर करायला येणार आहेस ना?’, त्यांनी मला विचारले. मीही ‘हो’ म्हटले. त्यानंतर ते भळाभळा बोलू लागले. ‘मोदीने, या सरकारने देशाची वाट लावली आहे. नोटाबंदी काय करतात, जीएसटी काय आणतात. ही काय हुकूमशाही आहे काय? लोकांना नागवताहेत हे. उद्या अजून काही कायदे आणतील गरिबांचे जगणे अशक्य करून टाकतील. आपण आजच आवाज उठवायला हवा,’ ते म्हणाले, त्यावर मी म्हणालो, ‘काका तुम्हाला पण नोटाबंदीचा खूप त्रास झाला असेल ना?’ ‘मला काय त्रास होणार आपली तर सरकारी नोकरी. आपल्याला काय त्रास? पण हे मोदी सरकार नको. त्याने देशाची वाट लावली आहे,’ ते काका म्हणाले.
वेळ: दुपारी ३.१० वा. ट्रेनमध्ये एक पत्रकार मित्र भेटला. त्याच्याशी नोटाबंदीबद्दल चर्चा झाली. तो म्हणाला, अरे नोटाबंदीमुळे लोकांना, सर्वसामान्यांना काय प्रॉब्लेम झाला हे जाणून घ्यायला सकाळपासून फिरतोय. पण अडचण आली असे सांगणारी फक्त एकच प्रतिक्रिया मिळाली. बाकीच्या प्रतिक्रिया सर्व नोटाबदींच्या बाजूच्या आहेत. आणि ऑफिसमध्ये सांगितले की, नकारात्मक प्रतिक्रिया करायला. काय करणार आता हा प्रश्न पडलाय. ज्यांनी नोटाबंदीनंतर लाईनमध्ये उभे राहताना सरकारला शिव्या दिल्या होत्या त्यांनाही गाठलं तर ते आता म्हणतात, नोटाबंदी झाली ते चांगलेच झाले. त्यात काहीही वाईट नाही, आता सांग, काय करायचे.
देशातील कोट्यवधी सर्वसामान्य लोकांसारखाच मी पण एक आहे. डोक्यावर कुठल्याही विचारांचे, पक्षाचे लेबल लावले नसल्यामुळे सर्वसामान्यांसारखाच विचार करतो. त्यांच्यासारखीच कृती करतो. नोटाबंदीचा फायदा समजायला मी काही अर्थतज्ज्ञ नाही. किंवा नोटाबंदीमुळे झालेले नुकसान समजण्या इतकाही माझा अर्थशास्त्राचा अभ्यास नाही. आर्थिक विषयाचे तज्ज्ञ काय बोलतात ते लिहून घ्यायचे आणि त्याची बातमी करायची. त्यात पुन्हा दोन मतप्रवाह स्पष्ट दिसून आले. काही तज्ज्ञ नोटाबंदीचे समर्थन करत होते तर काही नोटाबंदीचा विरोध. पण हे सर्व करत असताना प्रत्येकाची विचारसरणी त्यातून चांगलेच डोकं वर काढत होती. त्यामुळे ज्याला प्रत्यक्षात नोटाबंदीचा त्रास झाला म्हणून बेंबीच्या देठापासून बोंबलं जातंय त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून मिळालेली उत्तरे हीच खरी. कारण तोच सत्ताधीश धडवतो आणि तोच राजालाही भिकारी करतो. खोटं वाटेल, या सर्वसामान्य माणसाने जे अर्थशास्त्र मला समजावून सांगितले ते अन्य कुठल्याही अर्थशास्त्रज्ञाला जमलेले नाही. मोठ्या सुविधांची अपेक्षाच नाही, पण सुसह्य जगण्यात खोडा न घालणार्या प्रत्येक निर्णयाचे स्वागत हा सर्वसामान्य करतो. त्याच्यासाठी वाद-विवाद, चर्चा या वायफळ गोष्टी असतात. प्रत्यक्षात समोर जे दिसेल त्यावर तो विश्वास ठेवतो आणि त्याला आवडलं तर कमरेचंही सोडून देतो. म्हणून तर नोटाबंदीनंतर युपीत भाजपचा विजय झाला असेल का?

Comments
Post a Comment