रा. स्व. संघाबद्दलचा आकस कशाला?
मागच्या मे महिन्यात कोकणात पत्नीच्या गावी गेलो होतो. गावातल्या देवळात काही मंडळी बसली होती. त्यापैकी मला ओळखत असलेल्या एकाने माझी इतरांना ओळख करून दिली. हे पत्रकार आहेत, असेही पुढे सांगितले. त्यामुळे मग गाव आणि आजूबाजूच्या परिसरातील अडचणींचा पाढा माझ्यापुढे वाचणे सुरू झाले. त्यातून मार्ग कसा काढता येईल याचीही विचारणा झाली. मुख्यमंत्र्यांपर्यंत गार्हाणे मांडा असेही एका वयस्क गृहस्थांनी सांगितले. तितक्यात एका आजोबांनी शंका काढली. ‘तुमची आरएसएसमध्ये ओळख हा काय वो!,’ आजोबा म्हणाले. त्यांच्या प्रश्नाने मी चकीत झालो. कारण तो गाव आणि आजूबाजूच्या परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम नाही. गावातील मंडळींचा संघाशी कधी संपर्क आलेला नाही. तरीही आजोबा मात्र संघाबद्दल विचारत होते. ‘तुम्हाला कशाला संघ हवाय.’, असा प्रश्न मी त्यांना केला. त्यावर संघवाल्यांनी सांगितल्यानी तर भाजपवाले लवकर काम करतील, अशी पुश्ती त्या आजोबांनी जोडली. माझे लग्न झाल्यापासून मी दरवर्षी पत्नीच्या गावी जात आहे. मात्र मागील १६ वर्षांत संघ स्वयंसेवक पत्नीच्या गावी न पोहचताही संघ मात्र तिथपर्यंत पोहचला, याचे मला प्रचंड आश्चर्य वाटत होते. कोणत्याही परिश्रमाशिवाय संघ इथपर्यंत कसा पोहचला याचा विचार सुरू केल्यावर आढळले की संघाचा बागुलबुवा जो त्याच्या विरोधकांनी निर्माण केला तो संघाला सर्वदूर घेऊन गेला. सुमारे ९० वर्षांपूर्वी डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केल्यापासून संघ स्वयंसेवक आपले काम सातत्याने, अविरहित, घरादारावर तुळशीपत्र ठेऊन करत राहिले. संघ पसरत गेला तो त्यांच्या स्वयंसेवकांमुळे. नि:स्वार्थपणे हिंदू समाज आणि अखंड हिंदुस्तानाची सेवा करणारा संघ आणि संघ स्वयंसेवक हा प्रसिद्धीपासून लांब राहिला. उगाच गर्दी जमवण्यापेक्षा एक, दोनच कार्यकर्ते असे मिळावेत जे संघकार्यासाठी कोणतेही वैयक्तिक स्वार्थ सोडण्यास तयार होतील, या धोरणावर नितांत श्रद्धा ठेऊन संघ अखंड कार्यरत राहिला. त्यामुळे संघाचा प्रसार आणि प्रचार जरी होत होता तरी त्याची गती खूपच मंद होती. संघाबद्दल त्यावेळी आकसही नव्हता. त्यामुळे चीनच्या आक्रमण काळात १९६३ साली २६ जानेवारीच्या दिल्लीतील संचलनात धर्मनिरपेक्ष जवाहरलाल नेहरूंनी रा. स्व. संघाला सामावून घेतले होते. इतकंच नव्हेतर देशात लादण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात समाजवादी आणि संघ स्वयंसेवक खांद्याला खांदा लावून आणीबाणीच्याविरोधात लढले होते. त्यावेळी संघाबद्दल आसूया, आकस नव्हता. इतकंच काय पण संघाला मनुवादी संबोधण्याचे किंवा संघातील कथित जाती व्यवस्थेबद्दल शब्द काढण्याचे धाडस कोणी केले नाही. मग संघ जातीवादी, मनुवादी आणि राक्षसी वृत्तीचा कधी झाला? १९८४ साली स्थापन झालेल्या आठव्या लोकसभेत भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे भाजप हा पक्ष देशातील राजकारणात खीजगणतीतही नव्हता. १९८६ साली लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे अध्यक्ष झाले. त्यांनी पक्षाची हिंदुत्ववादी भूमिका अधिक तीव्र केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचा परिणाम म्हणून १९८९ सालच्या नवव्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ८५ जागा मिळाल्या. लोकसभेत भाजप एक ताकद म्हणून पुढे येऊ लागला होता. त्यानंतर खर्या अर्थाने भाजपवर आणि त्याची मातृसंघटना म्हणून रा. स्व. संघावर टीका सुरू झाली. ही टीका अर्थातच राजकीय हेतूने प्रेरित होऊन होत होती. भाजपचे खच्चीकरण करण्याचा त्यामागे डाव होता. पण संघाला लक्ष्य करताना त्याच्यावर खोटेनाटे आरोप होऊ लागले होते. संघ कधी त्या आरोपांना उत्तर द्यायला अथवा स्पष्टीकरण देण्यास पुढे आला नाही. संघाचे काम अविरत सुरू होते. संघावर दोषारोपण होत असताना संघ मात्र समाजोपयोगी कामे करत होता. भूकंप येऊ दे, पूर येऊ दे की कोणतीही नैसर्गिक आपत्ती. त्यात बचावाचे काम करताना खाकी हाफ पॅन्टवाले संघ स्वयंसेवक दिसत होते. संघाचा बागुलबुवा उभा केला जात असताना संघ मात्र लोकांमध्ये काम करत होता. आरोप आणि परिस्थिती भिन्न होती. १९९० साली अयोध्या मंदिराबाबत जनजागृती करण्यासाठी अडवाणी यांनी रथयात्रा काढली. त्या रथयात्रेला देशात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. तो प्रतिसाद पाहून भाजपचे विरोधकांचे विशेषत: समाजवादाचे राजकारण करणार्यांचे, कधी काळी जनतेसाठी झडणार्या राज्यकर्त्यांचे धाबे दणाणले. त्यातूनच बिहारमध्ये तत्कालिन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी रथयात्रा रोखली आणि भाजपसोबत संघाचा द्वेषाच्या राजकारणाचे युगाला खर्या अर्थाने भारतात प्रारंभ झाला. मात्र रथयात्रेने भाजपला अपेक्षित परिणाम साधला होता. १९९१ सालच्या लोकसभेत भाजपाचे १२० खासदार निवडून आले होते. आता भाजप प्रमुख विरोधी सर्वात मोठा पक्ष बनला होता. देशात सत्ताधारी पक्ष कॉंग्रेस असताना भाजप सोडून इतर पक्षांना मात्र भाजपचा धोका वाटू लागला होता. त्याला कारणही तसेच होते. सततच्या मुस्लीम तृष्टीकरणामुळे देशातील हिंदू समाजात नाराज झाला होता. हिंदू संस्कृती, सण यांच्यावर अखंड होणारी टीका आणि हिंदू असणेच म्हणजेच जातीयवाद या नव्या समीकरणाने देशातील हिंदु समाज मन दुखावले गेले होते. रा. स्व. संघाची राजकीय शाखा असलेल्या भाजपने त्यावर फुंकर घातली. त्यामुळे देशातील हिंदू भाजपच्या मागे एकवटत होता. संघालाही जनसहभागाचे पाठबळ मिळत होते. संघ स्वयंसेवक जनतेत राहून कोणताही बोबाटा न करता काम करत होते. संघासारखे एक मोठे नेटवर्क भाजपसाठी काम करत होते. भाजपविरोधी राजकारण करणार्यांना ते दिसत होते. त्यामुळे त्यांनी थेट संघावरच शरसंधान करण्यास सुरुवात केली. अयोध्येतील बाबरी मशिद पाडल्यावर या टीकेचा तर अतिरेक झाला. भाजपविरोध संघाचे नाव घेतल्याशिवाय भाजपवर टीका करण्याचेच विसरून गेले होते. पण त्याचा भाजप विरोधकांना अपेक्षित परिणाम होण्यापेक्षा विपरीत परिणाम झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव देशाच्या खेडोपाड्यात होऊ लागले. संघाची प्रतिमा मलिन करण्यासाठी त्यांच्यावर जातीयवादाचे आरोप करताना प्रत्यक्ष स्थिती तर विपरित होती. न्यूज चॅनलचा देशभरात प्रभाव वाढल्यानंतर त्याला ठोस आधारही मिळाला. संघ जातीयवादी, मुस्लीम विरोधक म्हणायचा तर नैसर्गिक आपत्तीच्या काळात संघ स्वयंसेवक मुस्लिमांनाही आधार देताना दिसत होते. ते मनुवादी म्हणायचे तर संघांच्या शाळेतून पहिले आलेल्या दलित विद्यार्थ्यांची छायाचित्र प्रसारमाध्यमांवर झळकत होती. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरविरोधी म्हणायचे तर महापरिनिर्वाण दिनी शिवाजी पार्कात आलेल्या दलित बांधवांना सहाय्य करताना, त्यांना खाण्याच्या वस्तू, पाणी देताना संघ स्वयंसेवक दिसत होते. भाजपविरोधी राजकीय पक्ष संघाला दुषण देत असताना अशा प्रत्यक्ष घटना संघाबद्दल देशातील जनतेच्या मनात सहानुभूती आणि कॉंग्रेससह डाव्या पक्षांच्याविरोधात संभ्रम निर्माण करत होत्या. त्यांना खोटे पाडत होत्या. संघ ही राष्ट्रीय विचारांनी प्रेरित झालेल्या तरुणांची जगातील सर्वात मोठी संघटना असल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले होते. स्वतंत्र बुद्धीने विचार करणार्या प्रत्येक देशवासियाला संघ आकर्षित करत होता. संघ कुठेही आपली जाहिरात करायला गेला नाही. स्वयंसेवक आपले काम निष्ठेने करत होते. पण संघाची जाहिरात मात्र त्यांचे विरोधक फुकटात करत राहिले. ९० चे दशक हा संघ टीकाकार आणि संघ यांच्यासाठी सुवर्णकाळ ठरला. या दशकात जगभरात इस्लामिक दहशतवादाने डोके वर काढण्यास सुरुवात केली होती. बाबरी पडल्यानंतर उसळलेल्या दंगली, त्यात मुस्लिमांचे करण्यात आलेले तृष्टीकरण, त्यात संघाला गोवण्याची डाव्या पक्षांना मिळालेली आयती संधी, १९९३ साली मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, त्याला पाकिस्तानने केलेेली मदत, अशा घटनांनी देशाचे वातावरण ढवळून निघाले होते. संघविरोधकांना चेव आला तसा भाजपला अच्छे दिन आले. केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर संघावरील टीका शिगेला पोहचली. पण त्याच बरोबर संघाचे ध्येय, उद्दिष्ठ आणि विचारसरणी जनमानसात रुजू लागली. त्याला विरोधकांनी खतपाणी घालताना आपल्या मुस्लीम तृष्टीकरणाची निती काही सोडली नाही. त्याचा परिणाम म्हणून हिंदू संघाकडे आकर्षित झाला. आज जागतिक स्तरावर इस्लामिक दहशतवादाने थैमान घातले आहे. भारत त्याचे जखमा आजही अंगावर घेतोय. मुस्लीम दहशतवादी देशात येऊन बॉम्ब फोडताहेत. काश्मीरमध्ये धुमाकूळ घालत आहेत. इतकेच नव्हेतर त्यांनी देशाच्या सार्वभौमत्त्वालाही आव्हान दिले आहे. पण संघाला प्रत्यक्ष मैदानात पराभूत करू न शकलेले कॉंग्रेस, डावे राजकीय पक्ष आणि त्या विचारसरणीच्या व्यक्तींची आत थेट अतिरेक्यांचे समर्थन करण्यापर्यंत मजल गेली आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावर, ट्रेनमध्ये, हॉटेलमध्ये दहशतवाद्यांच्या गोळ्या आणि बॉम्बने मरणार्या व्यक्तींना संघ जवळचा वाटू लागला आहे. संघ विरोधातून कॉंग्रेस आणि डाव्यांनी संघाला कुठे नेऊन ठेवलंय याचा विचार या सर्वांनी करायची गरज आहे. त्यासाठी आकसाची नव्हेतर अभ्यासबुद्धीची गरज आहे. संघाला पराभूत करण्यासाठी संघावर टीका नव्हेतर तितक्याच्या मोठ्या ताकदीची संघटना उभी करणे आवश्यक आहे. त्यासाठी कित्येक पिढ्यांचे बलिदान आवश्यक आहे. ते खरंच कॉंग्रेस, डाव्यांना शक्य आहे का? तोंडाच्या कष्टापेक्षा शारीरिक आणि मानसिक कष्ट मोठे असतात. त्यासाठी धीरोदत्तता लागते. शब्दांचे बाण नव्हेत ते तर बुमरँग असतात.

Comments
Post a Comment