बहुजन आणि दलित
राज्यात गैरकॉंग्रेसी सरकार आले की, दलितांवर अन्याय, अत्याचार होत असल्याची आवई उठवली जाते. कथित सवर्णांकडून दलितांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप होतो. हे सवर्ण कोण? देशातील ब्राह्मण अत्याचार करण्याच्या मनस्थितीत नाहीत. आताच ते अल्पसंख्याक झाले आहेत. अनेक ब्राह्मण तरुण देशात वाव नाही म्हणून अगोदरच परदेशात स्थायिक झाले आहेत. ब्राह्मणांचे दलितांशी रोटी-बेटीचे व्यवहारही झाले आहेत. अशा परिस्थितीत ते खरंंच दलितांवर अन्याय, अत्याचार करतील का? मग अन्याय, अत्याचाराचा कांगावा करून सवर्ण कोणाला ठरवलं जातंय? उजवी विचारसरणी, देशनिष्ठा, देशाचा गौरवशाली इतिहास, भारतीय संस्कृती, सणांबद्दल आस्था ठेवणारे या सर्वांनाच सवर्ण या संज्ञेत सामावून त्यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे केले जातेय. त्यातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा नेहमीच अशा अत्याचाराचा कांगावा करणार्यांचा बळीचा बकरा झालाय. त्याचा बागुलबुवा उभा करून डावे पक्ष आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम करत आहेत. त्यातून मग हिंदु प्रथा-परंंपरांना मानणारे आरोपी ठरवले जात आहेत. ही नवी विचारसरणी देशाला आणि देशाच्या अखंडत्त्वाला घातक ठरू लागली आहे.
दलितांवर अन्याय, अत्याचार करणारे कोण? शाहु-फुले-आंबेडकरांचा अखंड जप करणार्या बहुजनांनीच दलितांना अपमानाची वागणूक दिल्याचे दिसून येते. ‘जोपर्यंत आपली मने साफ होत नाहीत तोपर्यंत आपल्या दैनंदिन जीवनात नीतिनियमांबद्दल बेपर्वाई आणि गैरवर्तणूक चालूच राहणार. जोवर माणसामाणसांमध्ये जातीपातीचे अडथळे उभे ठाकलेले आहेत. तोपर्यंत या भारत देशाचा विकास होणे कदापी शक्य नाही,’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे विचार आजच्या परिस्थितीत अतिशय चपखल बसतात. ज्यांची मने साफ नाहीत तेच आज दलितांवरील अन्याय, अत्याचाराचा कांगावा करताना दिसत आहेत. राज्याची परिस्थिती पाहिली तर स्वत:ला बहुजन म्हणवणार्या राज्यकर्त्यांनी दलितांवर सर्वाधिक अन्याय, अत्याचार केल्याचे दिसून येईल. केवळ एखाद्या गोष्टीचा फायदा घ्यायचा म्हटल्यावर कथित बहुजन दलितांच्या आडोशाने पुढे सरसावतात. त्यांना दलितांबद्दल खरंच आस्था असती तर त्यांनी दलितांना आपल्यासोबत घेतले असते. मात्र ज्यांना या कथित बहुजनांनी सोबत घेतले ते कधीही मोठे होऊ नयेत याची व्यवस्था केली.
चेंबूर भागात चंद्रकांत हंडोरे हे मोठे दलित नेतृत्त्व होते. त्यांच्या मागे मोठा दलित समाज होता. चेंबूर आणि मुंबईच्या इतर भागात हंडोरेंचे कार्यकर्ते होतेे. हंडोरेंच्या नेतृत्त्वाखाली दलित समाज एकत्र येतोय, हे कॉंग्रेसमधील बहुजनांच्या लक्षात आल्यावर त्यांनी हंडोरेंना आपल्यासोबत घेतले. त्यांना महापौर, मंत्रीपदही देऊ केले. त्यात हंडोरे आणि दलित चळवळीचे प्रचंड नुकसान झाले. संपूर्ण दलित समाजाला नेतृत्व देऊ शकण्याची क्षमता हंडोरे हिरावून बसले. कॉंग्रेस हेच केवळ सर्वस्व मानून राहिले. आज हंडोरे कुठे आहेत? बहुजनांनी त्यांची शक्ती हिरावून घेतली. त्यांना फायदा उठवला आणि त्यांना अडगळीत टाकले. शिवसेना सोडून सर्वच राजकीय पक्षांमध्ये कमी अधिक फरकाने हेच केल्याचे दिसून येते. कॉंग्रेस, राष्ट्रवादी अगदी भाजपही त्यात सहभागी होतो. दलितांचा फायदा घेताना ते सोयीस्कररित्या बहुजन होतात. राज्यातील आतापर्यंतच्या मंत्रिमंडळांमध्ये ९० टक्के स्वत:ला बहुजन म्हणवणारे दिसून येतील. दलितांची वर्णी केवळ नावाला. अशा फायद्याच्या ठिकाणी दलितांना फारसे स्थान नाही. पुन्हा बहुजनांनी कितीही भ्रष्टाचार करो, त्याच्यावर कितीही गैरव्यवहाराचे आरोप होवो, त्यांचे मंत्रीमंडळ आणि पक्षातील स्थान पक्के असते. त्यांच्याबद्दल कोणीही ‘ब्र’ देखील काढत नाही. मग ते बहुजन तुरुंगात गेले तरी त्यांना पवित्र करून घेतले जाते. मात्र तिच व्यक्ती दलित असेल तर त्याला लगेचच राजीनामा द्यावा लागतो. आदिवासी नेते आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री बाबा आत्राम यांचे उदाहरण त्याबद्दल ताजे आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याबरोबर त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा काही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. ज्यावेळी दलित म्हणून एखाद्या व्यक्तीवर अन्याय, अत्याचार होत असतात तेव्हा अत्याचार करणार्याची एकच जात असते ती म्हणजे नराधम. तो माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचा नसतो. पण जेव्हा अत्याचार करणार्याची जात विचारली जाते तेव्हा मात्र त्यातून केवळ राजकारणच संभवत असते.
गुजरातमध्ये गाईची चामडी काढणार्यांना अमानुष मारहाण करणारे, कोपर्डीमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारे आणि बिहारमध्ये आंदोलन करणार्या दलित विद्यार्थ्यांवर काठ्या चालवणारे हे नराधम याच वर्गात मोडले जाऊ शकतात. मात्र अशा अन्याय, अत्याचारीत व्यक्तींना हाताशी धरून आपली राजकीय पोळी भाजणारे स्वत:ला बहुजन कसे संबोधू शकतात? या कथित बहुजनांकडे वाढलेल्या शोषणाच्या सामर्थ्यामुळेच राज्यातील दलित समाजावर अविरहित अन्याय, अत्याचार झाले आहेत आजही होत आहेत. डॉ. आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे माणसामाणसातील जातीय अडथळे उभे आहेत तोपर्यंत या देशाची प्रगती होणार नाही. मग हे अडथळे कोण निर्माण करतोय? ज्यांना देशाच्या प्रगतीपेक्षा एखाद्या घराण्याची, स्वत:ची प्रगती अभिप्रेत आहे अशीच लोक आज जातीपातीचे अडथळे निर्माण करत आहेत. त्यांंचीच मने साफ नाहीत. ती साफ असती तर जात ही मनातून आणि आचरणातून कधीच निघून गेली असती. कोपर्डीच्या घटनेनंतर अन्यायग्रस्त कुटुंबाला भेटायला सर्व राजकीय पक्षाचे नेते जाऊ शकतात. पण प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले यांना मात्र तेथे जाण्यापासून रोखण्यात येते. अन्यायग्रस्त कुटुंब; आपल्याला कोण भेटायला येते यापेक्षा त्या आघातातून आपली लवकर कशी सुटका होईल या विवंचनेत असते. मात्र जातीवरून दलित नेत्यांना रोखण्यात येत असेल तर ती जातीची आग तेथे कोणी लावली याचा शोध घेणे आवश्यक ठरते. सवर्णांना स्वत:च्या फायद्यासाठी बहुजन व्हायचे असेल तर ते किती दिवस टिकणार? त्यांना कोणीही वाली उरणार नाही. देशाचा विकास व्हायचा असेल जातीजातीतील भिंती दूर व्हायला हव्यात. त्यासाठी प्रथम जातीवरून राजकारण करण्याची या देशातील नेत्यांची खोड मोडायला हवी.
वर्णभेदाविरोधात लढणारे अमेरिकन कृष्णवर्णिय नेते मार्टीन ल्यूथर किंग (ज्युनियर) यांनी अमेरिकेतील वर्णभेद संपुष्ठात येऊन देश प्रगतीपथावर अग्रेसर होण्याचे स्वप्न पाहिले होते. किंग म्हणतात, ‘माझी चारही मुले एक दिवस अशा देशात रहातील ज्या देशात त्यांच्या वर्णावरून नव्हेतर त्यांच्या गुणांवरून त्यांची पारख होईल’. हेच स्वप्न डॉ. आंबेडकर, छत्रपती शाहू आणि महात्मा फुले यांनी पाहिले होते. त्यांच्या स्वप्नातील भारत हा जातीपातीविरहीत होता. त्यांनी त्यासाठी कोणाचा द्वेष केला नाही. मात्र त्यांच्या नावाचा अखंड जप करणार्या कथित बहुजनांना हे स्वप्न कधीच पटणारे नाही. फायद्यासाठी ते बहुजन होणार आणि फायदा करून घेण्यासाठी दलितांना जवळ करणार. वैषम्य एकाच गोष्टीचे वाटते की हे सर्व या देशातील दलित जनतेला अजून कसं हे वळलेलं नाही? दलितांचे नेते अजून किती दशके अशा बहुजनांच्या हातचे बाहुले बनून अखंडीत दलित समाजाचा वापर करणार? भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्त्व द्या, असे डॉ. आंबेडकर आपल्या अनुयायांना म्हणाले होते, ‘स्वाभिमान कधीच सोडू नका, तो सोडला की लाचारी येते आणि त्यातून पुन्हा पायात पडतात गुलामीचे साखळदंड’. जो चुकतो त्याला नक्कीच विरोध झाला पाहिजे. पण कोण म्हणतो म्हणून विरोध करायला गेल्यास प्रगती तर साधणार नाहीच; पण अधोगतीच्या दिशेने वाटचाल नक्कीच होईल.

Comments
Post a Comment