साप आण सोहळा!
स्थळ: राजकीय पक्षाचे कार्यालय. कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी. प्रत्येकजण कुजबुजल्यासारखे बोलतोय. कॅबिनमधून आता-बाहेर करणारे कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ. एकंदरीत वातावरणात काही तरी प्रचंड खदखदत होते. एक कार्यकर्ता कॅबिनमधून बाहेर येतो. बाहेर उभ्या असलेल्या एकाच्या कानात काही तरी कुजबुजतो पुन्हा आत जातो. इतर कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्याकडे आशाळभूत नजरेने बघू लागतात. ज्याच्या कानात कुजबुज झाली तोही धीरगंभीर अवस्थेत बाहेर रस्त्यावर कार्यकर्त्यांना गोळा करतो. आता काहीतरी ऐकायला मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून रहाते. कुजबुज वाढते. मग तो कार्यकर्ता नेत्याच्या भूमिकेत शिरून आदेश सोडतो, ‘आपल्याला साप शोधायचा आहे. साहेबांनी तसे आदेश दिलेले आहेत. लवकर कामाला लागा. ’ अनेकांच्या चेहर्यावर प्रश्नचिन्हाचे जाळे आपोआप विणले जातेय. पुन्हा कुजबुज वाढते. आतापर्यंत साहेबांकडून असे आदेश कधीच आलेले नव्हते. साहेब जास्तीत जास्त काय तर कामाला लागण्याचे आदेश द्यायचे. पण आताच असा विचित्र आदेश कसा? पण कोणाला प्रतिप्रश्न करण्याची हिंमत झाली नाही. आदेश मिळताच कार्यकर्ते पांगले. पण साप शोधायचा कसा? तो कुठे शोधायचा? त्याला शोधून करायचे काय, सगळेच प्रश्न अनुत्तरीत. एक ज्येष्ठ कार्यकर्ते मनाचा निश्चय करतात. या साप शोधण्यामागील राजकारणाचा छडा लावण्याचा निर्धार करून थेट कॅबिनमध्ये शिरतात. ते काय घेऊन बाहेर येतात, याची याकडे पुन्हा सगळ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या. कॅबिनमधून बाहेर येतातच, ते कार्यकर्त्यांवर जणू खेखसतात. ‘प्रश्न विचारू नका, चला कामाला लागा. आपल्या साहेबांना २०१९ साली आपल्याला पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळे आपल्याला साप शोधावाच लागेल, ’ अशी आरोळी उठते. साहेब, पंतप्रधान! या एकमेव आशेने कार्यकर्ते सुखावतात. सुखावल्याने प्रति प्रश्न करण्याचा सवालच शिल्लक उरत नाही. कार्यकर्ते आनंदाच्या परमडोहात स्वछंद बागडत आपल्याआपल्या घरी निघून जातात....
स्थळ दुसरे : वॉर्ड स्तरावरील कार्यकर्त्यांची बैठक. बैठकीला सहा ते सातजण उपस्थित. वॉर्ड अध्यक्ष सभास्थानावरून भाषण ठोकताहेत, ‘आपल्याकडे असलेले काम खरंच कठिण आहे. पण पंतप्रधानपद इतक्या सहजासहजी मिळत नसते. त्यासाठी खूप कष्ट उपसावे लागतात.’ एक कार्यकर्ता मध्येच शंका उपस्थित करतो, ‘पण मागे आपले साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा कुठे आपल्याला साप शोधण्याचा आदेश आला होता?’ ‘अरे तो साप साहेबांनी स्वत: बघितला होता. आता साहेबांना तो साप दिसलेला नाही. पण आपल्या वफ्पुलभाईंना तो दिसला आहे. त्यांनी तो साहेबांच्या अंगावरून जाताना पाहिला असणार. म्हणूनच त्यांना साहेब २०१९ साली पंतप्रधान होणार याची खात्री झाली. जाहीरसभेत वफ्पुलभाईंनी तसे सांगितले तरी साहेबांना आपल्या अंगावरून साप गेल्याची काही खात्री नाही. मुख्यमंत्री होण्याअगोदर त्यांच्या अंगावरून जो साप गेला तसाच हा नवीन साप आहे का, याची साहेबांना खात्री करून घ्यायची आहे. त्यामुळे साप शोधण्याचे आदेश आपल्याला आलेले आहेत, ’ वॉर्ड अध्यक्ष म्हणाले. ‘पण साहेब मुंबईत साप कसा मिळणार?’ एका कार्यकर्त्याच्या या प्रश्नावर वॉर्ड अध्यक्ष कोड्यात पडले. मुंबईत साप शोधण्याचे अग्निदिव्य पार कसे पाडायचे, यावर खल सुरू झाला. ‘वफ्पुलभाईंनी साहेब पंतप्रधान होणार हे कुठे सांगितले? ’ एका कार्यकर्त्याने सवाल उपस्थित केला. ‘अलिबागला’ सर्व जण एका सुरात उत्तरले. ‘हो ना, मग साप शोधण्याचे काम अलिबागच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना नको का द्यायला? तिथे साहेब होते, मग तेथेच त्यांच्या अंगावरून साप गेला असणार ना. आम्ही साप शोधायचा कुठून? ’ दुसर्या एका कार्यकर्त्याने उपस्थित केलेल्या प्रश्नावर सर्वजण तुटून पडले. चर्चा गंभीर वळणावर शिरली. आपण का साप शोधायचा, पासून ते हे आपलं कामच नाहीपर्यंत शंका सुरू झाल्या. सर्वांना गप्प करत, वॉर्ड अध्यक्ष गरजले, ‘हे बघा आपण जर काय साप शोधला नाही तर पुढल्या महानगरपालिका निवडणुकीत मला तिकीट मिळणार नाही, चालेल तुम्हाला. सांगा.’ नाईलाजाने सर्वांनी नकारात्मक माना हलवल्या. चालेल म्हणालो तर वॉर्ड अध्यक्षांकडून मिळणारा मेहनताना रद्द व्हायचा. त्यामुळे माना हलवून सर्वांनी होकार दिला. पण प्रश्न कायम होता. साप आणायचा कुठून? या सगळ्या गोंधळाचा मुखसाक्षीदार बनलेला एक कार्यकर्ता हात वर करून बोलण्याची संधी मागत होता. वॉर्ड अध्यक्षाची त्याच्यावर नजर गेली. सगळ्यांना शांत करत वॉर्ड अध्यक्षांनी त्याला बोलण्याची संधी दिली. ‘मी काय म्हणतो, मी एका गारुड्याला ओळखतो. त्याच्याकडे खूप साप आहेत. आपण त्याला चार-पाच साप घेऊन यायला सांगितले तर. म्हणजे काय आपल्याला साप शोधण्याची धावपळ करायला नको आणि आपण आदेश पाळल्याचेही साहेबांना दिसेल, ’ असे तो कार्यकर्ता म्हणाला. त्याबरोबर एकदम शांतता पसरली. प्रत्येकजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागला. ‘व्वा! काय आयडीया काढली आहेस हां तू’ वॉर्ड अध्यक्ष गरजले. सर्वांनाच त्याची आयडीया आवडली. प्रत्येकजण खूष झाला होता. अखेर ठरले. आजपासून चार दिवसांनी त्या गारुड्याकडून दोन-तीन साप घ्यायचे आणि साहेबांना नेऊन दाखवायचे.
चार दिवसांनी...
स्थळ : पक्षाचे तेच मुख्य कार्यालय. मात्र यावेळी संपूर्ण परिसरात प्रचंड गर्दी होती. संपूर्ण परिसराला पोलिसांनी वेढा घातला होता. पक्ष कार्यालयाच्या समोरच्या फूटपाथवर पोलिसांच्या गर्हाड्यात हातात फलक घेऊन प्राणीमित्रवाले उभे होते. ‘मुक्या प्राण्यांवर अन्याय अत्याचार सहन करणार नाही. मुख्यमंत्री, पंतप्रधान राजिनामा द्या, ’ अशा घोषणा बेंबीच्या देठापासून सुरु होत्या. त्यांच्या बाजूला एक कोपरा अंधश्रद्धा निर्मुलनवाल्यांनी व्यापला होता. सेक्युलर, अश्रद्ध साहेबांविरोधात आंदोलन करायची संकल्पनाच त्यांना पटलेली नव्हती. पण जननिंदा टाळण्यासाठी आंदोलनाची, झालेली सक्ती, त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होती. मिडियाच्या ओबी व्हॅनने ट्रॅफिक जाम करून टाकला होता. ‘अब थोडी ही देर में साप यहॉं आना शुरू होगा. पल पल की खबर सिर्फ हमारेही चॅनलपर,’ असे संवाद माईक हातात घेतलेल्या रिपोर्टर्सच्या तोंडातून उमटत होते. त्यांच्या या पल-पल की खबरने संपूर्ण देशाचे लक्ष त्या पक्ष कार्यालयावर लागले होते. इतक्यात नाशिकबाजाच्या आवाजाने आसमंत दुमदुमून गेला. एक नेता, टॅक्टरवरून येत होता. आजूबाजूला असलेले त्याचे कार्यकर्ते, त्याचा जयजयकार करत होते. टॅक्टरमध्ये मागे दहा-बारा पेट्या होत्या. सर्वांना हात जोडत, तो नेता विजयी मुद्रेतून पुढे सरकत होता. ‘आपको क्या लगता है, आप कितने साप लेके आये हो?’ एका पत्रकार मुलीने त्याला सवाल केला. ‘देखो मै १२ साप लेके आया हूँ. मेरे इतने साप कोई लाही नही सकता, साहेब का आदेश बोलेगा तो आदेश उसे पालनाच पडता है,’ तो नेता म्हणाला. पक्ष कार्यालयासमोर पोहचताच त्या नेत्याने सर्व पेट्या टॅक्टरमधून उतरवल्या. पक्ष कार्यालयाबाहेरील मोकळ्या जागेत त्या पेट्या ठेवल्या आणि मोठ्या ऐटीत तो नेता पक्ष कार्यालयात शिरला. त्यानंतर खर्या अर्थाने ‘साप आण सोहळा’ सुरू झाला. वॉर्ड अध्यक्ष एक-दोन साप, तालुका अध्यक्ष तीन-चार साप, जिल्हा अध्यक्ष पाच -सहा साप, प्रदेशाध्यक्षांपासून केंद्रीय कार्यकारणी सदस्यांपर्यंत आठ ते नऊ साप आणत होते. ज्याचे जसे पद तशी सापांची संख्या. इतक्यात मोठा आवाज झाला. डोळे लवतील असा प्रकाश सर्व बाजूने फाकला. मोठ्या सजवलेल्या ट्रकवर डोक्याला फडकं बांधून मानसपुत्राची स्वारी येत होती. हातात झेंडा फडक होता. ट्रकवरील भोंग्यातून आयटम सॉंग सुरू होते. ‘साहेबांना पंतप्रधान बनाकेच रहेंगे,’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. मानसपुत्र ट्रकवरून खाली उतरले. एकाने त्यांना विचारले, ‘किती?’ ‘बाव्वीस’ मानसपुत्राने सांगितले आणि त्यांचा लोहा सर्वांनीच मानला. एव्हाना कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी उसळली होती. पेट्या ठेवायलाही जागा नव्हती. एक-दोन पेट्यांमधून सापांनी पोबाराही केला होता. त्या सापांना पकडण्या ऐवजी ते साप साहेबांच्या विश्रांती रुममध्ये कसे शिरतील, याकडे कार्यकर्ते लक्ष ठेऊन होते. एक साप अंगावरून गेला तर मुख्यमंत्रीपद, मग पंतप्रधानपदासाठी किमान दोन साप तरी अंगावरून जायला नकोत का? असे साधे गणित त्यांनी मांडले होते. कोणालाही न सांगता साहेब झोपल्यावर त्यांच्या अंगावर साप सोडण्याची तयारीही त्यांनी केली होती. पण साहेब होते कुठे? ते गाडीतून आले, कार्यालयाबाहेरील गर्दी, गोंधळ बघितला आणि पंतप्रधानपद नको पण साप आवरारे, असे सेक्रेटरीला सांगत, तात्काळ तेथून त्यांनी काढता पाय घेतला. साप आण सोहळ्याचा, राष्ट्रीय समारोह हा असाच पुढे काही तास सुरू राहिला.

Comments
Post a Comment